पारोळा तालुक्यात दळवेलजवळ घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील दळवेलजवळ महामार्ग ५३ वरील हॉटेल स्वर्गसमोर मर्सिडीज कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील भोलाणे येथील गोरख सुरसिंग भील (वय ४७) असे अपघातात ठार झालेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, गोरख भील हे ३ रोजी दुचाकी (एमएच १९,
एझेड- ७५३९) ने पारोळा येथे श्री बालाजी महाराजांचा रथ पाहण्यासाठी आले होते. तेथून घराकडे परतताना महामार्ग ५३ वर दळवेल जवळील हॉटेल स्वर्गसमोर रात्री ८ वाजेच्या सुमारास मर्सिडीज कार (एमएच- १२, एक्सएन ८०९०) ने त्यांच्या दुचाकीला मागाहून जबर धडक दिली. या अपघातात गोरख भील यांचा डोक्यास, पायाला व छातीस गंभीर इजा झाली व त्यांच्या नाका, तोंडातून रक्तस्त्राव झाला.
त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या वाडी माळुगे येथील ओम तेजराज मनस्कर हे कार चालक गाडी चालवत होते. याबाबत प्रभू गोरख भील यांच्या माहितीवरुन पारोळा पोलिसांत मर्सिडीज कार चालक ओम तेजराज मनस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.