अटल पेन्शन योजनेत हेमांगी टोकेकर, कैलास गोपाळ, बदाम जाधव यांची प्रभावी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जुलै २०२५ महिन्यात जळगाव जिल्ह्यातील २३४७ स्वयंसहायता समूहांना एकूण ९३ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज विविध बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात एकूण ३०,००० स्वयंसहायता समूह कार्यरत असून हे अभियान जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रभावीपणे राबविले जात आहे.
जून २०२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्राम विकास यंत्रणा आर. एस. लोखंडे यांनी सातत्याने या बाबत आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीत, स्वयंसहायता समूहांना कर्जवाटप तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना यांची १००% अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.त्यानुसार, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांनी नियोजनबद्ध कामगिरी करून २३४७ समूहांना कर्ज वितरण सुनिश्चित केले. यामध्ये पाचोरा व जामनेर तालुक्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अटल पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीतही यशस्वी प्रगती दिसून आली आहे. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जळगाव येथील प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर यांनी १०९% कामगिरी बजावली. जामनेर तालुक्यातील प्रभाग समन्वयक कैलास गोपाळ यांनी ९३%, तर बदाम जाधव यांनी १००% काम पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जीवनोन्नती अभियानाअंतर्गत केलेली ही कामगिरी ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत आधार ठरते आहे. कर्जवाटप, विमा योजना व पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांना आर्थिक स्थैर्य देण्याचे ठोस पाऊल ठरत आहे.