जळगावात जिल्हा कारागृहात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा कारागृहात एका कैद्याने न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने बॅरेकमध्ये जाण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने गोंधळ घालून कारागृह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी दि. ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता कैद्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणारा अर्शद रब्बी पटेल (वय २१, रा. सुप्रिम कॉलनी) सध्या जिल्हा कारागृहात बंदीवान म्हणून आहे. शनिवारी दि. ५ जुलै रोजी अर्शद पटेल आणि इतर काही बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढण्यात आले होते. सकाळी ११ वाजता बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाली असता, कर्मचारी अंबादास जुलाल देवरे (वय ४०, रा. कारागृह वसाहत) यांनी पटेलला बॅरेकमध्ये परत जाण्यास सांगितले.(केसीएन)मात्र, पटेलने ऐकले नाही. “माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा,” अशी अट त्याने घातली. सुभेदार सुभाष खांडरे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक उपलब्ध नसल्याने आज त्याला तारखेवर नेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तरीही अर्शद पटेल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याने शिवीगाळ करत कर्मचारी देवरे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली आणि मारहाणही केली.(केसीएन)उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत देवरे यांना त्याच्या तावडीतून सोडवले. या गंभीर प्रकरणी कर्मचारी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अर्शद पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करत आहेत.