रावेर पोलिसांची मुक्ताईनगर येथे कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रावेर (प्रतिनिधी) :- पोलिसांनी येथील सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करून ४ लाख रुपयांच्या ॲल्युमिनिअमच्या तारांसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुक्ताईनगर येथील २ संशयित आरोपीना अटक केली.
रावेर येथील गट क्रमांक १७८३ मध्ये सोलर प्रोजेक्टरचे काम सुरू आहे. यासाठी शासकीय ठेकेदार भरत कमलाकर महाजन (रा. रावेर) यांनी प्रोजेक्टसाठी आणलेल्या सुमारे ४ लाख रुपयांच्या १०० स्क्वेअर एमएम कंडक्टरच्या सहा ॲल्युमिनिअम तारांचे बंडल चोरीला गेले. याबाबत रावेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख यांच्या पथकाने माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत चोरीचा तपास लावला.
मुदस्सर शेख बदरुज्जमा शेख (वय ३६, रा. जुनेगाव चाळीत मोहल्ला, मुक्ताईनगर) व सय्यद आकीब सय्यद हुसेन (२२, रा. इदगाहनगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले. तपासात त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख रुपयांचे ॲल्युमिनियम तारांसह गुन्ह्यात वापरलेली ४ लाख रुपयांची कार (एमएच ४३, बीबी ०५८६) असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष ईदा, पोलिस नाईक कल्पेश आमोदकर, पोलिस कर्मचारी संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विकारुद्दीन शेख, श्रीकांत चव्हाण तसेच चालक जमील शेख यांनी कारवाई केली.