धरणगाव तालुक्यात वाळूमाफियांचा हैदोस, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यात बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीपात्रात उपसा केलेली अवैधरीत्या वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरत असताना वाळूमाफियांना महसूल विभागाचे पथक नदीपात्रात आले. मात्र संशयितांनी पथकाशी हुज्जतबाजी केली. त्यानंतर ट्रॉलीतील वाळू नदीत उपसून पाच ट्रॅक्टर पळवून नेले. हा प्रकार गुरुवारी दि. १२ जून रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडला. शासकीय कामात अडथळा आणत हुज्जत घातल्याचा पाच संशयितांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच ट्रॅक्टर आणि ट्रॉली गिरणा नदीपात्रात उतरवून अवैधरीत्या वाळू भरून चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी सकाळी महसूल पथक गिरणा नदीत आले. चोरीची वाळू ट्रॉलीत भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरुवात करताच संशयितांनी पथकाशी हुज्जत घालत शासकीय कामात अटकाव निर्माण केला. ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू संशयितांनी नदीपात्रात उपसली. त्यानंतर पाच ट्रॅक्टर आणि ट्रॉली पळवून नेले. अवैधरीत्या वाळू भरलेले सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे पाच ट्रॅक्टरधारक गंगाराम सोनवणे, दिनेश नन्नवरे, दीपक सपकाळे, विशाल सपकाळे, ऋषी साळुंखे (सर्व रा. बांभोरी प्र.चा.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास साहाय्यक फौजदार सुनील लोहार करीत आहेत.