धुळे तालुक्यातील अवधान येथील घटना, अमळनेर शहरात शोककळा
अमळनेर ( प्रतिनिधी ) : – येथील रहिवासी व नुकताच साखरपुडा झालेल्या इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे याला बुडत असताना वाचविताना स्वतःचा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली. हिंदू-मुस्लिम मैत्रीच्या या भावनिक घटनेमुळे अमळनेर शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
इन्साफ आजाद खान (वय २२, अमळनेर) मयत युवकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच इन्साफचा साखरपुडा झाला होता. लग्न आणि संसाराचे स्वप्न पाहत असतानाच नियतीने घात केला. त्याच्या पश्चात आई- वडील आणि भाऊ अरबाज असा परिवार आहे. वडील आजाद खान हे येथील मुंदडा बिल्डर्समध्ये जेसीबी ठेकेदार आहेत तर भाऊ अरबाज हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.(केसीएन)इन्साफचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (वय २५, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते.
यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले. मात्र हे करीत असताना इन्साफचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. इन्साफने मित्राला तर पाण्यातून बाहेर काढले परंतु तो स्वतः बुडाला. यावेळी इतरांनी धाव घेत त्यालाही पाण्यातून बाहेर काढले. पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ७ वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. नेहमी अभ्यासात पुढे असणारा इन्साफ, मैत्री आणि जबाबदारी या मूल्यांमध्येही तितकाच पुढे होता. त्याची निस्वार्थ मैत्री आजच्या समाजाला अनुकरणीय आदर्श देऊन गेली आहे.