पाचोरा तालुक्यातील सांगवी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सांगवी येथे विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या पतीनेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैत्राबाई संतोष उर्फ सागर सोनवणे (वय २६, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, हल्ली मु. सांगवी ता. पाचोरा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. चैत्राबाईचे पती संतोष उर्फ सागर हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या कारणावरून मागील आठवड्यात चैत्राबाई संतोष उर्फ सागर सोनवणे या विवाहितेने सांगवी शेत शिवारातील विहिरीत पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैत्राबाई हिचे वडील रामलाल देवराम भंडागे (वय ४५, रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून चैत्राबाई हिचे पती संतोष उर्फ सागर शालिग्राम सोनवणे (हल्ली मु. सांगवी ता. पाचोरा) याचेविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.