मुंबई (वृत्तसंस्था) – निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं येत असून आज (बुधवारी) सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचे समजते. या चक्रीवादळाचे संकेत दिसू लागले आहेत. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला आहे, मालवण वेंगुर्ले गुहागर वेळास रत्नागिरी किनारपट्टीवरही वेगाने वारे वाहत आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांमध्येही बुधावारी पहाटेपासूनच वेगानं वारे वाहात आहेत. माहितीनुसार हे वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर असेल. तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच मुंबईला मोठे वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या निसर्ग वादळाचा मोठा फटका बसणार आहे.







