भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाजवळ गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसासह २ जणांना वरणगाव पोलीसांनी गुरूवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि बुलेट मोटारसायकल असा एकुण ९९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव शहरात रेल्वे स्टेशन रोडवर महात्मा गांधी विद्यालयाच्या पुढे एका टपरीजवळ दोन व्यक्ती बुलेट मोटरसायकलवर अवैधपणे गावठी पिस्तूल घेवून दहशत निर्माण करत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. गुरूवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी आदेश ज्ञानेश्वर भैसे (वय १९, रा. आंबेडकरनगर, वरणगाव) आणि गौरव संतोष इंगळे (वय २०, रा. वामन नगर, वरणगाव) या दोघांना अटक केली.
त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि बुलेट मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १२ डी.एन. ९०९७) असा एकुण ९९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विचारपूस करता आदेश भैसे याने सांगितले की, सदरचा कट्टा त्याने आणि सोनू सुनील भालेराव यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी चोपडा येथून सागर नावाच्या व्यक्तीकडून २० हजार रुपयांमध्ये घेतला होता.
पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद शेनफडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र सिताराम तायडे करत आहेत.