भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ संघटनेच्या भडगाव तालुका वतीने सोमवारी सकाळी भडगाव तहसील कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले होते. याबाबत तहसीलदार शितल सोलाट यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्याचे तात्काळ निवारण करून उपोषण सोडवले.
उपोषणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या होत्या. यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले शिव रस्ते /शेत रस्ते / पाणंद / पांदण / शिवार रस्ते / शेतावर जाण्याचे पाय मार्ग कालबध्द कार्यक्रमानुसार खुले करण्यासाठी बैठकी, तहसिल कार्यालयावरील प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे तातडीने निकाली काढणे, शासन निर्णयाप्रमाणे नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी त्वरित करावी, तहसिल कार्यालयात तहसिलदारांसमवेत शेतरस्त्यांसंबंधीत विभागांसोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा आदी मागण्या होत्या.
लक्ष्मण पाटील, देविदास महाजन, रामदास माळी, युवराज पाटील, अशोक पाटील, दिनकर पाटील, नीलकंठ पाटील, युवराज पाटील, वैशाली पाटील, बेबाबाई पाटील, देवराम माळी, सुनील जोशी, सुरेश पाटील, राजू मोरे हे शेतकरी उपोषणास बसले होते. यावेळी तहसीलदार शितल सोलाट यांनी उपोषण स्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्यांविषयी चर्चा करून त्यावर तोडगा काढत उपोषण सोडवले. प्रसंगी शेतकऱ्यांनी तहसीलदार सोलाट यांचे आभार मानत यापुढेही प्रशासकीय कामकाजासाठी आपले सहकार्य लागेल अशी विनंती केली.