दीड लाख संशयितांच्या चाचण्या पूर्ण, 23 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 651 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (7 सप्टेंबर रोजी) 4 हजार 85 संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 284 इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या 9 हजार 398 बाधित रुग्णांपैकी 8 हजार 154 रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये तर जागरुक राहून आपल्या कुटूंबात कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी नागरीकांना केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 1 लाख 49 हजार 284 चाचण्यांपैकी 1 लाख 14 हजार 267 अहवाल निगेटिव्ह तर 33 हजार 618 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण हे 22.51 टक्के इतके आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.43 टक्के इतके वाढले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.







