सातारा (वृत्तसंस्था) – सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खुन करण्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे़. शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे. या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच रामनगर येथे मोठा जमाव जमला असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या घटनेनंतर तेथे वादावादी झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.