नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे.
हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी स्वतंत्र अॅपच्या वापराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी तीन दिवसांत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 53 लाख लसींचा साठा मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.