मुंबई (वृत्तसंस्था) – आग्र्यातील सिकंदरा भागातील दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भयंकर आहे की, अग्निशमन दलाच्या नियंत्रणाबाहेर असून लष्करालाच पाचारण करण्यासाठी मदत मागण्यात आली आहे.
आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर टोप्लास्ट आणि आग्रा केमिकल नावाच्या दोन कंपन्या आहेत. या दोन कंपन्यांमध्ये ही आग भडकली आहे. या आगीच्या धुराचे लोट कित्येक किमी दूरवरून दिसत आहेत. धोक्यामुळे हायवेवरील वाहतूक थांबविण्यात आली असून कंपन्यांच्या आजुबाजुच्या घरांतील लोकही बाहेर पडले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.
या फॅक्टरींमध्ये बनत असलेल्या केमिकलचा वापर बुटांचे सोल बनविण्यासाठई केला जातो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आतापर्यंच या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. आजुबाजुच्या कंपन्यांमध्ये, घरांमध्येही ही आग पसरण्याची शक्यता असून यामुळेच लष्कराची मदत मागण्यात आली आहे.
आगीचे स्वरूप पाहून आजुबाजुच्या घरांना रिकामे केले जात आहे. हवाईदल आणि रिफायनरीकडून मदत मागण्यात आली आहे. तसेच फायर टेंडरही बोलविण्यात आल्याचे एसपी बोत्रे रोहन प्रमोद यांनी सांगितले.