जळगाव ( प्रतिनिधी) – पूर्व वैमनस्यातून छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरात तरुणाला लोखंडी कोयताने पायावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, विकास मधुकर साळवे (वय 34) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह राहायला असून पेंटरचे काम करून आपले घरखर्च चालवितो. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरातील रेशन दुकानाच्या ओट्यावर विकास साळवे बसलेला होता. त्यावेळी त्याच भागातील राहणारा श्रीकांत मोरे हा येऊन विकास साळवे याला शिवीगाळ करून मारहाण करून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने विकासच्या उजव्या पायावर मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी अवस्थेत विकासला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रविवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात विकास साळवे यांच्या जबाबदावरून संशयित आरोपी श्रीकांत मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.