नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाचा वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी एकीकडे देशात ४ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असताना ३९२७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे.
फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. १० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. रुग्ण बरे होत असले तरी पण वाढता मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.
तत्पूर्वी अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र अमेरिका आणि ब्राझीलला भारताने मागे टाकलं असून नकोसा उच्चांक नावावर झाला आहे
दरम्यान, देशात बुधवार सकाळपासून पुढील 24 तासांत तब्बल 4 लाख 12 हजार 262 नवे करोनाबाधित आढळले. एका दिवसातील बाधित संख्येचा तो आजवरचा नवा उच्चांक ठरला होता. त्याशिवाय, एका दिवसात देशात सर्वाधिक 3 हजार 980 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.