मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील आमदारांच्या हॉटेलच्या बांधकामासाठी नुकतंच ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भातील एक ट्विट सुद्धा रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
रोहित पवार म्हणतात..’अतुल भातखळकर जी आपला मुद्दा मला योग्य वाटतो, पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे, तरीही मी याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन.
पण तुम्ही देखील 22 हजार कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि 13 हजार कोटींचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल.., अशी खोचक टीका पवार यांनी अतुल भातखळकर यांच्यावर केली.
आमदारांच्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना. अशी टीका भातखळकर यांनी केली. त्यांच्या याच टीकेला रोहित पवार पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.