नवी मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केलं.
चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर वळसे-पाटलांशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं. तसेच महिला अत्याचार रोखण्यासंदर्भातील निवेदनही दिलं. राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलीस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलांचा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे?, असा सवाल वाघ यांनी निवेदनात केला आहे.
पोलीस दलातील महिलाच आज पोलीस दलातील पुरुष सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट शोभनीय नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. राज्यातील आयाबहिणींचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहेच. पण पोलीस दलात काही विकृत पोलीस असून ते आपल्या महिल्या सहकाऱ्यांवरच अत्याचार करत आहे. या घटनांचा आलेख वाढत असून हे चित्रं भयावह आणि चिंताजनक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.