जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ऑनलाईन औषधींची विक्री करणाऱ्या वेबसाईटवर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बेकायदेशीपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ‘मेशो’ या ऑनलाईन वेबसाईटसह इतर वेबसाईटवर औषधींची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी कर्मचाऱ्यासह चौकशी केली. यात जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील अमोघा हाईटस् मुंदडानगर येथील फ्लॅट क्रमांक २५ येथून ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचे समोर आले. २९ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान विविध औषधांची विक्री केल्याचेही समोर आले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी २ मेरोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मेशो पोर्टलसह इतर वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि गोपाल देशमुख करीत आहेत.