मुंबई ( प्रतिनिधी ) – महा विकास आघाडी सरकारनं राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रानं तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याता निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर आता राज्य सरकारनंही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून नवा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही थेट वाढ होणार आहे. राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारनं केलेल्या महागाई भत्त्यातील वाढीनुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के इतका डीए मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रातील सरकारी कर्मचारी या दोघांना 2022 पासून नव्या महागाई भत्त्याप्रमाणे वेतन मिळणार आहे.