जळगाव ( प्रतिनिधी ) – लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तांबापुर परिसरातील नाथ गल्ली येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश प्रकाश चव्हाण रा. डी-मार्ट जवळ, तांबापूरा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आकाश चव्हाण याला अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी आणि युनूस अरबाज तडवी तिघे रा. तांबापुरा जळगाव यांनी नाथ गल्लीत हातातील कडे आकाशला मारून दुखापत केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आकाशचा भाऊ रवी प्रकाश चव्हाण याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी आणि युनूस अरबाज तडवी या तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री १० वाजता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.
