मुंबई (वृत्तसंस्था) – राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. “सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं पाच स्तरीय योजना तयार केली आहे. संसर्गाचा दर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची उपलब्धता हा निकष त्यासाठी लावण्यात आला आहे. रुग्णवाढीचा वेग अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार असून सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून असं सगळं उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, जळगावचा समावेश आहे.
राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे: पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार , दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार , तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक , चौथा टप्पा – निर्बंध कायम , पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन







