मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका नव्या वादात सापडल्या. पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आल्याची माहिती दिली होती. यासंदर्भातील ट्विटवर एका यूजरने हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणाला दिलं? असा सवाल केला असता किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’असं उत्तर दिलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना पेडणेकर म्हणाल्या की माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. त्याची मी हकालपट्टी केली आहे’,

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवरुन टोला लगावला आहे. ‘आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर, यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे टोला लगावला आहे.
महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.







