मुंबई (वृत्तसंस्था) – चाकण, भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात असतानाही या कुटुंबाच्या भेटीला आले नाही. यावरुन या राज्य सरकारमध्येही संवेदनशीलता राहिली नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडीतील एका 17 वर्षीय मुलीला शुक्रवारी (दि. 24) विवस्त्र करुन निघृणपणे हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 26) दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, माजी आमदार संजय भेगडे, उमा खापरे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. कायद्याचा धाक कुणालाही राहिला नाही. राज्यात बलात्कार, विनयभंग अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. घटनास्थळी भेटीही दिल्या जात नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.