मुंबई (वृत्तसंस्था) – अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरुन राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका, असा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
राममंदिर जन्मभूमीचे राजकारण सदैव सुरुच राहिले. ते 5 ऑगस्टला तरी कायमचे संपावे, असे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. अयोध्येतून निघालेली साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्थानकावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यानंतर गुजरातमध्ये जो दंगा झाला तो सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असाच होता. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर पंतप्रधान केले. म्हणजे या राजकीय चढाओढीतही राम आहेच, अशी टीका राऊत यांनी केली.
गुजरातमध्ये गोध्राकांड घडले नसते तर आजच्या मोदींचे स्थान आणि रुप आपल्याला पाहता आले नसते. छत्रपती शिवाजीराजे आणि प्रभू श्रीराम या दोन विभूतींच्या नावाने जितके राजकारण गेल्या 30 वर्षांत झाले ते पाहिले की, आपण आजही श्रद्धा आणि भावनेच्या विषयांतच गुंतून पडलो आहोत याची खात्री पटते,असे देखील राऊत म्हणाले.