भडगाव (प्रतिनिधी) – एका महिलेने आपला मुलगा व मुलीसह आत्महत्या केल्याच्या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील कनाशी येथे बुधवारी सायंकाळी कनाशी येथे राहत असलेल्या गायत्री दिनेश पाटील ( वय ४३), मुलगा- खुशवंत दिनेश पाटील (१०वर्ष ) मुलगी-भैरवी दिनेश पाटील ( ८ वर्ष ) या तिघांचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती . या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात होती. मात्र गुरूवारी विवाहीतेच्या वडिल दिलीप पुंडलिक पाटील (वय ६३) व्यवसाय शेती, रा वाघाडी बु.( ता शिंदखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासु सासरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी गायत्री हिस पती दिनेश निंबा पाटील, सासू पमा निंबा पाटील , सासरे निंबा रामदास पाटील, जेठ बबन निंबा पाटील, जेठाणी सोनी बबन पाटील यांनी थ्रेशर मशीन घेण्यासाठी पन्नास हजार रुपये तर कनाशी येथे प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपयांची वेळोवेळी मागणी करून तिला प्रसंगी मारहाण, शिवीगाळ, करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिला त्रास असह्य झाल्याने मुलगी गायत्री हिने काल सकाळी सहा वाजेच्या पूर्वी शेतातील विहिरीत दोन मुलांसह आत्महत्या केली.







