जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरुण येथील स्मशानभूमीजवळ जुन्या भांडणातून हनुमान नगर येथील तरुणाला चार ते पाच जणांनी लाकडी दांडका तसेच धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील हनुमान नगर येथे बिजासन फकीरा घुगे ( वय – २८ ) हा तरुण राहतो, मेहरुण मधीलच काही तरुणांसोबत बिजासन याचा जुना वाद आहे. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भैय्या देवीदास सोनवणे व केतन जगदीश सोनवणे हे दोघे जण आले. व बिजासन याला तुझ्यासोबत काम आहे, असे म्हणून दुचाकीवरुन मेहरुण स्मशानभूमीकडे घेवून गेले. याठिकाणी अजून काही जण उभे होते. या पाच जणांनी जुन्या वादातून बिजासन याला लाकडी दांडक्याने, लाथाबुक्कयांनी तसेच काहीतरी धारदार वस्तूने मारहाण करुन गंभीर दुखापत केली.
या घटनेत बिजासन हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरुन शनिवारी मारहाण करणाऱ्या भैय्या देवीदास सोनवणे, केतन जगदीश सोनवणे, गोकूळ विठ्ठल बोरसे, प्रविण रमेश सोनवणे, व वासू जाधव सर्व रा. तलाठी ऑफिसजवळ मेहरुण या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.