पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्यांनी त्रास जाणवल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाचोरा- भडगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील गेल्या दोन दिवसांपूर्वी मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भातील आढावा व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. शुक्रवारी (ता. 21) सायंकाळी ते मुंबईहून परतल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास झाला. त्यांची कन्या अभिनेत्री डॉ. प्रियंका पाटील हिने त्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासंदर्भात आग्रह केल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आमदार किशोर पाटील यांना खोकल्या व्यतिरिक्त इतर कोणताही त्रास नाही.
गेल्या आठवड्यात त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना व शिवालय कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश देत स्वतः क्वारंटाईन झाले होते. परंतु, कामानिमित्ताने मुंबई येथे जाणे आवश्यक असल्याने ते मुंबईला गेले असता त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी निवासस्थानीच क्वारंटाईन होऊन उपचार घेण्यास सुरवात केली असून जे कोणी संपर्कात आले असतील त्यांना काही त्रास जाणवल्यास त्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.







