नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरूच आहे. दरम्यान आता ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला.
दक्षिण दिनाजपूर येथील प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जींनी मोदी, शहांवर हल्लाबोल चढवला. आम्ही गुजरातला आमच्या राज्यावर कब्जा करायला आणि दिल्लीतून सरकार चालवायला अजिबात देणार नाही. बंगालवर बंगालचेच राज्य असेल. असे ममता बॅनर्जी यांनी म्हंटल.
भाजपचे नेते आपल्या प्रचारसभांमधून बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार बनवण्याच्या हेतूने राज्यातील जनतेला आवाहन करीत आहेत. याचा अर्थ असा की केंद्र आणि राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असावे, असा भाजपचा मनसुबा आहे. हा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती सोपवणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.