मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) तौक्ते चक्रीवादळाचा फटाका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधी पक्ष टीका करत आहे.मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी कऱण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यासंदर्भात दरेकर यांनी हे ट्विट केलं आहे.
दरेकर ट्विटमध्ये ते म्हणतात, विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाहणी करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. ‘मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,’ असंही ते म्हणाले.