रत्नागिरी (वृत्तसंस्था) – सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याच पार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणवासीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ते आले…अन् न पाहताच निघून गेले. मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे, असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तेच केले. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणवीस आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली, असं निलेश राणे यांनी म्हटले आहे.
‘माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही’, असं देखील निलेश राणे यांनी म्हटले आहे.