पुणे (वृत्तसंस्था) – तौत्के चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ मे) कोकण दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोले लगावले आहेत.
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौत्के चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुनच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधानांच्या पाहणीवेळी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे पंतप्रधानांना हवाई पाहणी करण्याचा गुप्तचर यंत्रणांचा सल्ला होता. महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे..वादळात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयांची सरसकट मदत मोदीजींनी गुजरातमधून घोषित केली आहे. ही मदत केवळ गुजरातला केली हा प्रचार चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.