धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील एकाने मारहाण करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, अल्पवयीन मुलीने महिला व बाल कल्याण समितीकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तिच्या आई-वडिलांनी मुलगी ही अल्पवयीन असताना देखील तिचे यावल तालुक्यातील एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. त्यानंतर तिचा पती दारू पिऊन तिच्याशी भांडण करून मारहाण करत होता. त्यानंतर ती घर सोडून सुरतला निघून गेली. तिथून पोलिसांनी ताब्यात तिला जळगाव येथील महिला व बालकल्याण समिती येथे दाखल करून घेतले. महिला व बालकल्याण समिती जळगाव येथे दोन महिने राहिल्यानंतर तिचे आई-वडील तिला घेण्यासाठी आले व पीडीत मुलगी ही आई-वडिलांसोबत राहू लागली. दरम्यान तिच्या नात्यातील एकाने तिच्याशी जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केला, आरडाओरड केली तर तिला मारहाण करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पीडित मुलीने बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून तिच्या नात्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.