जळगाव (प्रतिनिधी) – संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी अधिवेशनात विधानसभेत केली.
महाराष्ट्र शासनाने विविध संत, महात्मे व महापुरुषांच्या जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेशात संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा समावेश नसल्याने जळगाव येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेसह समस्त शिंपी समाजातर्फे आमदार राजूमामा भोळे यांना दोन वर्षांपूर्वीच निवेदन दिले होते. त्यानुसार, आमदार भोळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. सध्या मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याच्या प्रस्तावाचे निवेदन शून्य प्रहर कामकाजप्रसंगी केले.
संत नामदेव महाराजांची जयंती ही शासकीय गॅजेटमध्ये नोंदवून शासकीय स्तरावरुन ती साजरी करण्याचा प्रस्ताव सादर केला. आमदार भोळे यांनी समस्त समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रश्न विधीमंडळात मांडल्याने त्यांचे शिंपी समाजातर्फे कौतुक होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदाय व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वारकरी बांधवांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर केले.