जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पन्नालाल वखारनजीकच्या नर्सरी जवळ एकाने दारू पिण्यासाठी तरूणाची दुचाकी अडविली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरूणाच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवार १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अंकुश चंदन मलके (वय-28, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) हा तरुण आपला परिवारासह राहायला असून किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अंकुश हा दुचाकीने पन्नालाल वखार नर्सरी जवळून घराकडे येत असताना कुणाल अनिल बागडे (रा. कंजारवाडा, जळगाव) याने तरूणाचा रस्ता आडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. अंकुश ने पैसे दिले नाही म्हणून कुणाल बागडे याने शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर अंकुश मलके हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८.३० वाजता संशयित आरोपी कुणाल अनिल बागडे रा. कंजरवाडा, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.