नाशिक (प्रतिनिधी) – ‘बहिणाबाईचा लेक सोपानदेव चौधरी’ या चरित्रग्रंथाचे व ‘हजार धागे सुखाचे’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा काही दिवसांपूर्वी नाशिक येथे पार पडला.
‘सोपानदेव चौधरी हे आनंद वाटणारे कवी’ होते अशा भावना व्यक्त करत, छंद व वृत्तांवर सोपानदेवांचे प्रभुत्व होते. कवितेचा छंद हा कवितेचा प्राण आहे, हे त्यांनी त्यावेळी नमूद केले. ते आनंद वाटणारे कवी होते, असे प्रतिपादन कवी सोपानदेव यांचा सहवास लाभलेले साहित्यिक नरेश महाजन यांनी केले. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शनिवारी (दि. ८) लेखक किरण सोनार लिखित ‘बहिणाईचा लेक सोपानदेव चौधरी’ या चरित्रग्रंथाचे व ‘हजार धागे सुखाचे’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ‘मविप्र’चे शिक्षणाधिकारी व समीक्षक डॉ. भास्कर ढोके, ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास भामरे, विवेक उगलमुगले, बहिणीबाई चौधरी यांच्या पणतसून श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक तथा जैन इरिगेशनचे ग्रंथपाल अशोक चौधरी, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रकाशक विलास पोतदार यांच्यासह सुनंदा सोनार, सरला सोनार, विजया भामरे, डॉ. मंजुषा सोनार, मनीषा सोनार, वैशाली पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोक चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सोपानदेव चौधरी (आप्पा) बहिणाबाईंचे सुपुत्र म्हणून लोकांना माहिती आहेत परंतु ते एक उत्त्कृष्ठ कवी, लेखक, गायक, संवादक व शिक्षक होते. त्यांची स्वतंत्र अशी प्रतिभा त्यांनी निर्माण केली होती. आप्पांसारखे बहिणाबाईंचे साहित्यिक गुण जरी आमच्यात आलेले नसले तरी आम्ही बहिणाई आणि आप्पांचा वास्तू आणि वस्तूरूपी ठेवा “बहिणाई स्मृती’ या वस्तु संग्रहालयात जतन करीत आहोत. असे सांगून जळगावच्या बहिणाई स्मृतीला आपण सर्व नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संग्रहालय उभारणीसाठी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टची स्थापना जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी बहिणाई परिवारासोबत केली असून जैन इरिगेशनचे भक्कम पाठबळ ट्रस्टला मिळत आहे. ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांचे देखील मार्गदर्शन, सहकार्य सतत मिळत असते अशी कृतज्ञताही चौधरी यांनी याप्रसंगी व्यक्त केली.