चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आमदार मंगेश चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी आणेल असा शब्द दिला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत रस्त्यांसाठी नगरविकास विभागाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.हा शासन निर्णय प्राप्त झाला आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अडीच वर्षे राज्यात सत्ता नसताना शक्य होईल तिथे उभा राहिलो आहे. शासकीय निधीच्या भरवशावर न राहता प्रसंगी पदरमोड केला आता आपले सरकार असून येणाऱ्या काळात शहरात नियोजनबद्ध आराखडा तयार करून शहर समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहील” पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दोन दिवसांपासूनच आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली होती. आमदार चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. आता या कामांना शासकीय निधीची जोड मिळाल्यामुळे रस्त्यांच्या समस्यांमधून कायमची मुक्ती होणार आहे.
या ५ कोटींच्या निधीतून हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्ता कॉक्रीटीकरण (२ कोटी १५ लक्ष) , डी.वाय.एस.पी. ऑफिस धुळे रोड ते यश नगरीतून जाणारा रस्ता डांबरीकरण (९० लक्ष) , अभिनव शाळेजवळचा नाका (भडगाव रोड) ते करगाव रस्ता रेल्वे बोगद्याला जोडणारा रस्ता डांबरीकरण, ( कोटी २५ लक्ष) , सदानंद हॉटेल ते पावर हाऊस रोड (७० लक्ष) ही कामे केली जाणार आहेत .
शहरासह ग्रामीण जनतेला शहरातील बाजारपेठ, बाजार समितीशी जोडणारा रस्ता म्हणून हॉटेल दयानंद ते खरजई नाका या रस्त्याची ओळख आहे. दररोज अवजड वाहनांसह छोट्या मोठ्या हजारो वाहनांची या रस्त्यावरून वर्दळ असते. प्रभाग क्रमांक ३ व ५ मधील नागरिकांचादेखील हा मुख्य रस्ता आहे. ४ वर्षापूर्वी ५० लक्ष रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पाणी निचरा होण्यासाठी जागा नसल्याने रस्ता खड्डेमय झाला. त्याचे कॉक्रीटीकरणच करावे अशी मागणी होत होती. याची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी कॉक्रीटीकरणसाठी २ कोटी १५ लक्ष निधी मंजूर केला आहे.
शहरात सुरु असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे यशनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी डी.वाय.एस.पी. ऑफिस धुळे रोड ते यश नगरीतून जाणारा रस्ता डांबरीकरण कामासाठी ९० लक्ष रुपये मंजूर केले आहेत.