जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील ढाके कॉलनी परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा संसार मोडावा या उद्देशाने एकाने अश्लिल मजकूर लिहून विवाहितेचे पती व नातेवाईकांना पोस्टाद्वारे पत्र पाठविले आहे. तसेच पत्रात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ढाके कॉलनी परिसरातील एका भागात २८ वर्षीय विवाहिता पती व सासरच्या मंडळींसोबत राहायला आहे. विवाहितेचे लग्न ठरल्याच्या काळात आणि विवाह झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने तिच्या पतीला व तिच्या नातेवाईकांना २०१८ पासून ते आजपर्यंत अश्लिल मजकूर लिहून तिची बदनामी व्हावी आणि तिचा सुखाचा संसार मोडावा या उद्देशाने पत्र पाठविले. तसेच पत्रात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. यासंदर्भात विवाहितेने बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख करीत आहे.