जळगाव (प्रतिनिधी) – पाळधीहुन जळगावला येत असताना दुचाकीस्वाराला बांभोरी जवळील जैन इरिगेशन कंपनीसमोर अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असणारा एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी १४ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
पाळधी तालुका धरणगाव येथील रहिवासी कडू सुकलाल धनगर (वय ५५) हे त्यांची ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट घेण्यासाठी पाळधीहून दुचाकीने जळगावला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास निघाले होते. सोबत दीपक ईश्वर कुंभार (वय २८) यालाही त्यांनी सोबत घेतले होते. बांभोरी जवळील जैन इरिगेशन कंपनीजवळ आल्यावर अज्ञात अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत कडू धनगर हे दूरवर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच गतप्राण झाले. त्यांच्यासोबत असणारे दीपक कुंभार यांच्या पायाला व हाताला मार लागला असल्याने त्यांना शासकीय रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कडू सुकलाल धनगर यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. या ठिकाणी त्यांचे कुटुंब व मित्रपरिवाराने आक्रोश करीत भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी प्रक्रिया पूर्ण केली.
कडू धनगर यांच्या पश्चात पत्नी संगीता, मुलगा सुकलाल असा परिवार आहे. मुलगा सुकलाल हा देखील स्वतःच्या मालवाहू वाहनावर चालक म्हणून काम करीत आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाळधी परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित झाले होते.