अमळनेर (प्रतिनिधी) – मागील दिड वर्षांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण साहजिकच वाढलेला आहे.अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड अधिग्रहित केल्यामुळे जिल्ह्यातील इतर सामान्य रुग्णांचे मात्र काही प्रमाणात हाल होत आहेत.यात दिव्यांग व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, म्हणूनच दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी तसेच प्रमाणपत्र नूतनीकरनासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालयात पूर्वीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
कोविडची परिस्थिती हळू हळू सुधारत असल्याने प्रशासनाने आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग व्यक्तींचे प्रमाणपत्र व नुतनिकरणाचे जे काम वर्षापासुन बंद आहे ते सुरू करून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र व व नुतनीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून त्यांची वणवण थांबावी. सध्या महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरीलाट ओसरली असुन जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या कमी आहे, यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालय मधुन पुन्हा सामान्य रुग्णांसाठी पुर्ववत सुरु करण्यात यावे ही विनंती आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाकडे मांडलेली आहे. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांना देखील या विषयाची दखल घेण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागणार
दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण झाले नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.प्रशासनाने दखल घेतल्यास अमळनेर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील दिव्यांगांना याचा लाभ मिळू शकतो.