जळगाव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा कारागृहात शुक्रवारी 11 सप्टेबर रोजी संशयीत आरोपी रविंद्र उर्फ चिन्या जगताप याचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांची एकुणच भूमिका संशयास्पद असुन त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना अहवाल देण्यास उशिर केला. आता न्यायालयीन चौकशी होणार असल्याने त्यातून काय सत्य बाहेर येते त्यावर लक्ष लागून आहे.
शहर पोलीस स्थानकात दाखल हाणामारीच्या गुन्ह्यामध्ये रविंद्र जगतापसह इतरांवर गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात रविंद्र उर्फ चिन्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. शुक्रवारी 11 रोजी चिन्याला अचानकपणे सामान्य रुग्णालय असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत करागृह प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली. चिन्याच्या कुटुंबियांनादेखील माहिती दिली नाही. तसेच चिन्याच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती देखील द्यायला कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड तयार नाहीत त्यामुळे कारागृह प्रशासनाची चुप्पी नेमके काय दर्शविते हे सर्वच संशयास्पद आहे.
चिन्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसर्यादिवशी शनिवार पर्यंत देखील जिल्हाधिकारी आणि कारागृह महानिरीक्षक यांना चिन्याच्या मृत्यूबाबत कुठलाही अहवाल गेला नसल्याची माहिती मिळाली. कारागृह अधिक्षकांनी अहवाल वेळीच देण्याचे का टाळले? तसेच कुटुंबियांना देखील माहिती का दिली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी तसेच कारागृह उपमहानिरीक्षक यांना अधिक्षक पेट्रस गायकवाड यांनी फक्त एक पानाचा अहवाल दिला असुन त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही. तसेच कारागृहातून चिन्या जगतापला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय? याबाबत कुठलीही माहिती अहवालात दिलेली नाही त्यामुळे कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांच्या भूमिकेबाबत अधिकच संशय वाढला आहे.
कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहे. त्यामुळे चिन्याच्या बाबत करागृहात नेमके काय घडले हे सांगता येणे कठिण आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी कैदी व कर्मचारी यांच्या समक्ष चिन्याला बेदम मारहाण झाली असावी असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याला पुरेसा वाव आहे. कारण चिन्याच्या मृत्यूला 24 तास उलटण्याच्या आधिच कारागृहातील तब्बल 20 कैद्यांना जालना, औरंगाबाद येथे हलविण्याबाबत कागदपत्र तयार केले जाते व कारागृह प्रशासन तातडीने त्यांना जळगावातून दुसर्या जिल्ह्यातील कारागृहात हलविते. हे सर्व कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणा व कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार या कैद्यांच्यासमोर चिन्याला कारागृह अधिक्षकांसह तीघा कर्मचार्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेविषयी कोणाकडेच काही सांगायचे नाही, असा दम देखील कारागृह अधिक्षकांनी त्यांच्या कर्मचार्यांना भरल्याचे समजले आहे. याबाबत निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षीत आहे.
गेल्या दिड महिन्यांपासून पेट्रस गायकवाड हे कारागृह अधिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कामकाजा विषयी त्यांनी आतापर्यंत कुठल्याच माध्यमांशी संवाद साधलेला नाही. तसेच त्यांचे कर्मचारी देखील कुठलेही कारण सांगुन कारागृह अधिक्षकांना भेटू देत नसल्याचे समजते.
दरम्यान कारागृहात आता 295 पुरुष व 15 महिला असे 310 कैदी आहेत. मागील शनिवारी 5 सप्टेबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळी एकुण 442 कैदी कारागृहात होते. पुढील आठ दिवसातच आज 132 कैदी कमी होवून 310 संख्या झाली आहे. यापैकी 40 कैदी जालना येथे तर औरंगाबाद येथे 10 कैदी हलविल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कारागृहातील ताण काहीसा हलका झाला आहे.
बेफाम वागणुकीला जबाबदार कोण?
चिन्याचे शवविच्छेदन न्यायमुर्ती डी.बी. साठे यांच्या समक्ष इनकॅमेरा झाले. आता हे प्रकरण न्यायालय चौकशीमध्ये गेले आहे. या चौकशीमधून काय सत्य बाहेर येते. हे लवकरच दिसुन येईल. मात्र कारागृह अधिक्षक आणि त्यांच्या बेफाम वागणार्या कर्मचार्यांच्या वागणुकीला कोण लगाम घालेल? हा खरा प्रश्न आहे.