मुंबई( वृत्तसंस्था) –‘मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पू्र्ण राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला होता. तोच कायम राहणार आहे’ असं पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
‘आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं’ असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
‘महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं गैर नाही. 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष आहे’ असंही राऊत म्हणाले.