नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. त्यात आता दलित आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनुसूचित जातीतील व्यक्तींनी धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केल्यास, ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच असे लोक अनुसूचित जातीसाठी मिळणाऱ्या आरक्षणाचाही फायदा उठवू शकणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
धर्मपरिवर्तन केलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींना राजकीय आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्र्यांनी उत्तर दिले. दरम्यान, अनुसूचित जातीतील दलित बांधव जे हिंदू आणि बौद्ध धर्माला मानतात ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकतात. आरक्षणाचा फायदाही घेऊ शकतात. राज्यसभेमध्ये बीजेपी खासदार जीबीएल नरसिंह राव यांनी ‘आरक्षित निवडणूक क्षेत्राची पात्रता’ यावर प्रश्न विचारला होता.
दरम्यान संविधानामध्ये अनुसूचित जातीबद्दल पॅरा-3 ही विविध राज्यातील अनुसूचित जातीतील यादी सांगते. या अंतर्गत एखादा व्यक्ती हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म व्यतिरिक्त धर्म मानत असेल आणि तो अनुसूचित जातीचा सदस्य असेल तर त्याला अनुसूचित जातीच्या सदस्य मानला जाणार नाही. अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र असणारी कोणतीही व्यक्ती आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हणाले.