मुंबई (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. जे दिशा बरोबर झाले.. तेच पुजा बरोबर होणार असेल.. तर तो ‘शक्ती’ कायदा.. काय चाटायचा आम्ही? असा सवाल नितेश राणे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
तर निलेश राणे म्हणाले, पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा आणि पूजाला न्याय द्यावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.