जळगाव (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगामार्फत दि. 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. यातंर्गत दि. 7 नोव्हेंबर, 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दिनांक 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले नागरीक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे वंचीत नागरीक पदनिर्देशित ठिकाणी नमुना-6 अर्ज भरुन मतदार महणून नोंदणी करु शकतील.
तसेच एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना-7 अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे नमुना-8 अर्ज भरुन आपल्या नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल, अथवा नमुना-8 अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघातंर्गत आपला पत्ता बदलता येईल. याबाबतचे दावे/हरकती दि. 5 जानेवारी, 2021 पर्यत निकालात काढण्यात येणार असून दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.








