नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पण उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याच्यापूर्वीच बीसीसीआय समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत असे संकेत दिले आहेत.
आता इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूदेखील आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे समजत आहे.सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये ते तीन वन-डे आणि तीन T20 मॅचची सिरीज खेळणार आहे. ही सीरिज फ्यूचर टूर प्रोग्रॅमचा एक भाग आहे. हि सिरीज रद्द किंवा स्थगित केली जाऊ शकत नाही. यामुळे जर आयपीएल सप्टेंबरमध्ये खेळवली गेली तर तर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.
मुंबई इंडियन्सचे एडम मिल्ने , ट्रेंट बोल्ट,सनरायझर्स हैदराबादचा केन विल्यमसन,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फिन एलन आणि काईल जेमीसन,कोलकाता नाईट रायडर्सचे लॉकी फर्ग्युसन, टीम सीफर्ट, चेन्नई सुपर किंग्सचा मिचेल सँटनर हे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीत.
इंग्लंडच्या खेळाडूंनी देखील उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. असे संकेत इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऍश्ले जाईल्स यांनी दिले आहेत. इंग्लंडच्या ठरलेल्या सीरिज आणि आयपीएलच्या उरलेल्या मॅच एकाचवेळी होणार आहेत. यामुळे इंग्लंडचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत. असे देखील ऍश्ले जाईल्स यांनी सांगितले आहे.