मुंबई (वृत्तसंस्था) – शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर राजकारणाची संधी मिळाली. मी ती जबाबदारी एका पातळीपर्यंत चोखपणे पार पाडली, याबद्दल मी समाधानी आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. यंदा भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला होता. देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना प्रत्युत्तर दिले. पवारसाहेब मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. मला जे करता येईल ते मी केले. मात्र, खऱ्या लढाईच्यावेळी मी आजारी पडलो. पण मला शक्य असणाऱ्या सर्व गोष्टी मी केल्या. मी ही लढाई वरच्या टप्प्यात नेऊन ठेवली, याचा मला आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बिहारच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या झालेल्या दारुण पराभवाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. आम्ही तेजस्वी यादव यांना मोकळीक देण्यासाठी ताकदीने निवडणूक लढवलीच नाही, असे शरद पवार म्हणतात. पण शेवटी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षांमध्ये फरक असतो. प्रादेशिक पक्षांना मर्यादा असतात. मात्र, तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा आव आणून ही निवडणूक लढवली. मात्र, बिहारच्या जनतेने त्यांना जागा दाखवून दिली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण
बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केलं. जे बोलत नाहीत, पण मतदान करतात, त्यामुळेच एक्झिट पोल चुकतात, असं निरीक्षण विरोधीपक्ष नेते आणि बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवले.
मला वाटतं की एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाची ही लाट आहे. याचं कारण मी बिहारमध्ये बघितलं 15 वर्षांचं सरकार होतं. अँटी इन्कम्बन्सी असते. पण मोदींबाबत प्रो इन्कम्बन्सी होती. लॉकडाऊनमध्ये बिहारमध्ये गेलेल्या मजुरांची नीट सोय झाली, बिहारमध्ये पूर आला, त्यांनाही मदत केली. लोकांना वाटलं आपल्या पाठीशी उभं राहणारे मोदीजी आहेत. त्याचाच भाग म्हणून मोदींवर विश्वास टाकण्यात आला आणि मतात रुपांतर झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.







