बनोटी ता.सोयगाव (प्रतिनिधी) – कपाशी पिकामध्ये वखरटीचे काम करीत असताना सर्पदंश झाल्याने एका पस्तीसवर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील शेतशिवारात घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अजय ताराचंद चव्हाण (वय 35) असे मयताचे नाव आहे. सोयगाव तालुक्यात सुरवातीपासून पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कपाशी पिकांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ पिकामध्ये गवत देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने सद्या शेतकरी कपाशी शेवटची वखरटी करुन घेत आहे. अजय चव्हाण हे गट नं.143 मध्ये कपाशीची वखरटी करीत असताना त्यांना सर्पदंश झाला हे लक्षात येताच घरच्या मंडळींना तात्काळ उपचारासाठी पाचोरा जिल्हा जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घरातील कर्ता माणूसाचे असे दुदैवी मृत्यू झाल्याने सर्व कुटुंब उघडल्यावर आले आहे.
अजय चव्हाण यांची उत्तरीय तपासणी पाचोरा जिल्हा जळगाव येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आली. असुन नांदगाव तांडा येथील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,आई असा परीवार आहे.