मुंबई(वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग अँगलमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. रियाने याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिन याचिका दाखल केली. ज्याच्या सुनावणीदरम्यान अभिनेत्रीने नारकोटिक्स क्राइम ब्यूरो (Narcotics Crime Bureau)वर काही गंभीर आरोप केले आहेत. रियाचे असे म्हणणे आहे की, एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले. एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे.
रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी जी जामिन याचिका दाखल केली आहे, त्यात असे म्हटले आहे की, अटकेच्या दरम्यान (एनसीबीच्या) याचिकाकर्तीला (रिया) कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. अभिनेत्री असे सर्व कबुलीजबाब औपचारिकरित्या मागे घेते आहे. याचिकामध्ये रियाने असेही म्हटले आहे की तिची अटक ‘अनावश्यक आणि विनाकारण केली गेली’.