अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यात रस्ता लूट करणार्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.५ नोव्हेंबर रोजीच्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नविन रेल्वे पुलाच्या पुढे एकुण सहा अज्ञात इसम हातात लोखंडी रॉंड व दगड घेवुन रोडावर मोठे दगड आडवे लावुन रस्ता लुट करण्यासाठी जमले होते. त्यांनी एका टँकर चालकास मारहाण करुन जबरदस्ती लुटल्याची घटना घडली होती. या संदर्भात अमळनेर पो.स्टे.गु.र.न.५१२/२०२२ भा.द.वि.कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच यापुर्वी देखील नमुद ठिकाणी असे लुटमारीचे किरकोळ प्रकार झालेले होते परंतु कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाहीत. अर्थात, यामागे एक सुनियोजीत टोळी असल्याचा संशय बळावला होता.
या संदर्भात पो.नि.जयपाल हिरे यांनी सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ राजेंद्र देशमाने यांचे पथक तयार केले होते. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यातचअमळनेर पो.स्टे.रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे कडेस गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरु असतांना त्यातील एकाने प्रथम उडवा – उडवीचे उत्तरे देवुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने कबुली जबाब दिला. यानुसार त्यांच्या टोळीनेच अनेक घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. यातील तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन आरोपींची फिर्यादी कडुन ओळख परेड बाकी असल्याने त्यांचे नावे उघड करण्यात आली नाहीत.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे. उप विभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या निर्देशानुसार आणि पो.नि.जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पो. ना. मिलींद भामरे, पो. ना. सुर्यकांत साळुंखे, पो. कॉ. राहुल पाटील, पो. कॉ. राजेंद्र देशमाने यांनी पार पाडली आहे. तसेच, अमळनेर पोलीसांकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, चोपडा रोड रेल्वे पुलाजवळ कोणासोबत अशा प्रकारची घटना घडुन लुट झाली असल्यास अमळनेर पोलीसांशी संपर्क साधावा.